Dr. Aabaji Thatte Seva Aur Anusandhan Sanstha

Location

JAMTHA |  DHARAMPETH

HelpLine

1800-233-0033


By  Dr. Abhinav Deshpande
Consultant Surgical Oncology
National Cancer Institute, Nagpur
     
On 03 June 2020

कुठल्याही आजारासारखेच कर्करोगामध्येही पूर्वनिदानाला आणि प्रतिबंधात्मक उपायाला महत्त्व आहे. पण कर्करोग हा खरोखरंच रहस्यमयी विकार आहे. कर्करोग कशामुळे झाला हे शोधणे कठीण असले तरी काही कर्करोगांची कारणे आपणास ठावूक आहेत.
जसे –

  • मुखाचा कर्करोग झाला तर त्याचे कारण अर्थातच तंबाखू आहे.
  • फुफ्फुसांचा कर्करोगास धुम्रपान जबाबदार आहे.
  • काही उद्योगांमध्ये रसायने अथवा काही धातुंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कर्करोग झाल्याचे आढळले आहे.
  • कुठलीही काळजी न घेता किरणोत्सारी पदार्थांच्या संपर्कात आल्यास कर्करोगाचा धोका वाढतो.

ही काही कर्करोगाची कारणे असून या बाबी तसेच मादक पदार्थांचे व्यसन टाळले, चांगल्या सवयी आत्मसात केल्या, सकस आहाराचे सेवन केले व शिस्तबद्ध आयुष्य जगण्यास सुरुवात केली तर आपणास ठावूक असलेल्या कारणांमुळे होणारा कर्करोग टाळता येऊ शकतो.

योग्य वेळी निदान केल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो

कर्करोगाबद्दल एक भ्रामक कल्पना अशी की, कर्करोग बरा होत नाही किंवा त्यावर उपचार उपलब्ध नाही. मात्र, कर्करोगावर उपचार असून योग्य वेळी निदान केल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. कर्करोगावर उपचार करण्याच्या दोन पद्धती आहेत.

पहिली म्हणजे क्युरेटिव्ह.

जेव्हा कर्करोग शरीरात कमी प्रमाणात पसरला असेल तर त्याव जास्तीत जास्त उपचार करता येतो. जर कर्करोगाचे योग्य वेळेस अथवा पहिल्या स्तरात निदान झाले तरच हे  उपचार करता येणे शक्य आहे. योग्य वेळेत निदान होण्यासाठी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.  गेल्या भागात आपण ज्या लक्षणांची चर्चा केली , तशी काही लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

दुसरी उपचार पद्धती म्हणजे पॅलिएटिव्ह.

त्यास आपण सर्वसाधारणपणे परिहारक वा दुःखशामक उपचारपद्धती म्हणू. म्हणजे कर्करोग शरीरात पसरला असल्याने त्याचे समुळ उच्चाटन शक्य नाही. पण कर्करोगामुळे होणारा त्रास व वेदना उपचारांनी कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पॅलिएटिव्ह उपचार पद्धती.

“कर्करोगामुळे होणारा त्रास व वेदना उपचारांनी कमी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पॅलिएटिव्ह उपचार पद्धती.”

कर्करोगाच्या स्टेजेस्

आपण चर्चा करताना कर्करोगाच्या स्टेजेस् बद्दल बोलत असतो. कर्करोगाचे स्तर तीन बाबींवर अवलंबून आहे.

पहिली बाब म्हणजे ट्युमरचा आकार; त्याचे वर्गीकरण करण्यासाठी आपण टी (T) हा प्रातिनिधिक शब्द वापरतो,

दुसरी बाब म्हणजे वाढलेल्या ग्रंथी म्हणजे लिम्फ नोडस् मधील गाठी; त्याचे वर्गीकरण करण्यासाठी आपण एन (N) हे अक्षर वापरतो. आणि,

तिसरी बाब म्हणजे मेटॅस्टेसिस अर्थात कर्करोग संपूर्ण शरीरात पसण्याची क्रिया; त्यास आपण एम(M) हे अक्षर वापरतो. आता ‘टी-एन-एम’ क्लासिफिकेशनुसार कर्करोगाचे स्तर ठरतात.

पुढील भागात कर्करोगाच्या निदानासाठी कोणकोणत्या चाचण्या करतात त्याचा आढावा घेऊ.